सत्यध्येय एकविचार उपसंपादक योगिता जोशी
कल्याण : कल्याणमध्ये कथित गुंडगिरी आणि खंडणीखोरीचा गंभीर प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कल्याण-शीळ रोडवरील टाटा पॉवर परिसरातील देशमुख होम्सजवळ हॉटेल व्यावसायिक पंकज दुबे यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावणे, अपहरण करणे आणि फायटर व चाकूने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अजित सिंह आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पंकज दुबे यांना, ‘तुझा भाऊ वेळेवर आमच्याकडे हप्ता पाठवत नाही, तुम्हाला जास्त मस्ती आली आहे,’ असे म्हणत धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना बंदुकीचा धाक दाखवून फायटर आणि चाकूने मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पंकज दुबे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. पंकज दुबे हे कल्याणमधील उद्योजक राजन दुबे यांचे बंधू आहेत.या घटनेची गंभीर दखल घेत मानपाडा पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत. अजित सिंह याच्याविरोधात यापूर्वीही १५ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे.व्यावसायिकाला कथितरीत्या धमकावणे, मारहाण करणे आणि खंडणीची मागणी केल्याच्या आरोपांमुळे कल्याणमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.
![]()
