सत्यध्येय एकविचार उपसंपादक योगिता जोशी
कल्याण : कल्याणजवळील वरप परिसरात जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित गरबा कार्यक्रमादरम्यान तलवारी घेऊन आलेल्या तरुणांनी धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. तीन ते चार मोटारसायकलींवरून आलेल्या पाच ते सहा तरुणांनी हातात तलवारी घेऊन गरब्यात प्रवेश केला आणि सुरू असलेला डान्स थांबवल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे उपस्थित नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली.तलवारी घेऊन सार्वजनिक कार्यक्रमात प्रवेश केल्याच्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण चर्चेत आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमात शस्त्रे घेऊन प्रवेश करणे, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवणे यांसारख्या बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास केला जात आहे.दरम्यान, टिटवाळा पोलिसांनी सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची आणि चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. घटनेमागील नेमके कारण, संबंधितांची भूमिका आणि तलवारींचा वापर करण्यामागील उद्देश याबाबत पोलीस तपास करत आहेत.
सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शाळेच्या परिसरात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात अशा प्रकारची घटना घडल्याने सार्वजनिक कार्यक्रमांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात नेमके कोणते कायदेशीर कलम लागू करण्यात आले आहे, तसेच पुढील तपासात काय निष्पन्न होते, हे पोलिसांच्या अधिकृत माहितीनंतर स्पष्ट होईल.
![]()
