सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी :
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर लागवडीविरोधात शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महादेव दोंदवाडा परिसरातील अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील अतिदुर्गम डोंगराळ भागात अज्ञात व्यक्तींनी गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अंदाजे ७ कोटी ६७ लाख रुपये किमतीची, एकूण ३,०६८ किलो वजनाची गांजाची उभी पिके शोधून काढली. दुर्गम भागात वाहन नेणे शक्य नसल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही झाडे घटनास्थळीच जाळून नष्ट करण्यात आली.दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी महादेव दोंदवाडा परिसरातील वनविभागाच्या जमिनीवर प्रतिबंधित कॅनाबीस (गांजा) वनस्पतींची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील कक्ष क्रमांक १००८, नियत क्षेत्र महादेव दोंदवाडा येथे कारवाई करण्यात आली. राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच, वनपरिक्षेत्रीय अधिकारी, वजनकाटाधारक, छायाचित्रकार आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले.या कारवाईत पहिल्या ठिकाणी १,५२८ किलो वजनाची अंदाजे ३ कोटी ८२ लाख रुपये किमतीची, दुसऱ्या ठिकाणी ६८० किलो वजनाची १ कोटी ७० लाख रुपये किमतीची, तिसऱ्या ठिकाणी ३२० किलो वजनाची ८० लाख रुपये किमतीची, चौथ्या ठिकाणी २८० किलो वजनाची ७० लाख रुपये किमतीची, तर पाचव्या ठिकाणी २६० किलो वजनाची ६५ लाख रुपये किमतीची गांजाची उभी पिके आढळून आली. अशा प्रकारे एकूण ३,०६८ किलो वजनाची आणि अंदाजे ७ कोटी ६७ लाख रुपये किमतीची गांजाची झाडे नष्ट करण्यात आली.गांजाची पिके अतिदुर्गम डोंगराळ भागात असल्याने तेथे कोणतेही वाहन नेणे शक्य नव्हते. त्यामुळे NDPS कायद्याच्या कलम ४८ मधील तरतुदीनुसार गांजाची झाडे उपटून त्यांचे वेगवेगळे ढीग करण्यात आले आणि घटनास्थळीच जाळून नष्ट करण्यात आली. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०१/२०२६ अन्वये NDPS कायदा कलम ८(क), २०(अ)(i) आणि २८ नुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजाची लागवड कोणी केली, त्यामागे कोणाचे जाळे आहे आणि या प्रकारात अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्रीय अधिकारी कैलास सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार तसेच पोलीस अंमलदार संजय चव्हाण, मोहन पाटील, राजू डिसले, संदीप ठाकरे, जाकिरोद्दीन शेख, दिनेश सोनवणे, रोहिदास पावरा, संजय भोई, भूषण पाटील, सुनील पवार, गिरधर पाटील आणि होमगार्ड मोतीलाल पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदेशीर लागवड आढळून आल्याने परिसरातील वनजमिनींच्या देखरेखीचा आणि या लागवडीमागील सूत्रधारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर लागवडीला मोठा धक्का बसला असून, या प्रकरणातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे आणि लागवडीमागील संपूर्ण जाळे उघड करणे हे आता तपास यंत्रणेसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
![]()
