सत्यध्येय एकविचार नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने नंदुरबार शहरात मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत विमल पान मसाला आणि वी-१ तंबाखूची वाहतूक करणारे आयशर वाहन पकडण्यात आले. प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन, असा एकूण ६९ लाख ४७ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त सपना गोडसे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता करण चौफुली ते जकातफाटी मार्गावर, करण चौफुलीजवळ धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर वाहनाला थांबवून तपासणी करण्यात आली. या तपासणीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला आणि वी-१ तंबाखू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची अंदाजित किंमत ३९ लाख ४७ हजार १५० रुपये, तर आयशर वाहनाची अंदाजित किंमत ३० लाख रुपये आहे. या दोन्हींची एकत्रित किंमत ६९ लाख ४७ हजार १५० रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, सुरेंद्र रोहित डौले आणि संकेत आबा सदाफुळे यांच्या पथकाने केली. आयुक्त तुकाराम मुंडे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहनचालक मोहम्मद हलीम आणि इतर संबंधितांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.महाराष्ट्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने तपासणी व कारवाई करण्यात येत आहे. प्रतिबंधित पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, जप्त केलेला साठा कुठून आणण्यात आला होता आणि तो नेमका कुठे पोहोचविण्यात येणार होता, याबाबतच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
![]()
