सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असल्या, तरी यंत्रणेतील अनास्थेमुळे त्या कागदावरच कशा राहतात, याचे उत्तम उदाहरण शिंदखेडा तालुक्यात समोर आले आहे. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नंदुरबार अंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांच्या ‘किराणा दुकान योजनेची’ प्रकरणे तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. कागदपत्रांची छाननी, मुलाखती आणि पंचनामे पूर्ण होऊनही केवळ अधिकाऱ्यांच्या लालफितीच्या कारभारामुळे लाभार्थ्यांना मंजुरी मिळालेली नाही. याप्रकरणी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या महाव्यवस्थापकांना सविस्तर निवेदन देत न्याय मागण्यात आला आहे.
दोन वर्षांपासून पूर्तता होऊनही मंजुरी नाही
शिंदखेडा तालुक्यातील अनेक गरीब आदिवासी बांधवांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शबरी महामंडळाच्या किराणा दुकान योजनेअंतर्गत कर्ज व अनुदानासाठी अर्ज दाखल केले होते. या प्रकरणांची सर्व कायदेशीर प्रक्रिया जसे की छाननी, मुलाखत आणि महामंडळाच्या पथकाकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्यात आलेला पंचनामा ही पार पडला आहे. मात्र, या सगळ्या प्रक्रियेला दोन वर्षे उलटूनही लाभार्थ्यांना ना मंजुरी आदेश मिळाला, ना बँकखात्यात निधी जमा झाला.
अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप
या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी लाभार्थ्यांनी नंदुरबार येथील शबरी महामंडळ कार्यालयात वारंवार फेऱ्या मारल्या. मात्र, तिथे कार्यरत असलेले अधिकारी श्री. हितेश पाटील हे विचारणा केली असता योग्य प्रतिसाद देत नसल्याचे व जाणीवपूर्वक आदेश काढण्यास टाळाटाळ करत असल्याचा संतापजनक आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आदिवासी बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. **न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
गरीब आदिवासी बांधवांचे होत असलेले आर्थिक नुकसान थांबवावे आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
१. शिंदखेडा तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रकरणांची तातडीने चौकशी करणे,
२. विलंबासाठी जबाबदार अधिकारी श्री. हितेश पाटील यांच्याकडून खुलासा मागवणे आणि,
३. पात्र लाभार्थ्यांना तत्काळ मंजुरी आदेश देऊन लाभ वितरीत करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या शिष्टमंडळात दिपक अहिरे यांच्यासह अशोक सोनवणे, सुनिल सोनवणे, महेंद्र मालचे, बापु ठाकरे, अशोक ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
![]()
