सत्यध्येय एकविचार धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्हा कारागृहातील बॅरक क्रमांक दोनमध्ये जेवणानंतर ताट धुणे आणि हात धुण्याच्या जागेवरून न्यायबंद्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाहिद अब्दुल रऊफ शेख, सचिन ऊर्फ बब्या दौलत जाधव आणि आदित्य राजेंद्र मेढे या तीन न्यायबंद्यांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कारागृहातील अंतर्गत शिस्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जेवण झाल्यानंतर न्यायबंदी आकाश गजानन मरसाळे हा पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ ताट स्वच्छ करीत होता. त्याचवेळी शाहिद अब्दुल रऊफ शेख हा हात धुण्यासाठी त्या ठिकाणी आला. जागेच्या वापरावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेल्या वादाचे पुढे शिवीगाळ आणि हाणामारीत रूपांतर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या वादात सचिन ऊर्फ बब्या दौलत जाधव आणि आदित्य राजेंद्र मेढे यांनीही सहभाग घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बॅरकमध्ये तैनात असलेले तुरुंगशिपाई अजिंक्य फकिरा आहेरे यांनी गोंधळ ऐकून संबंधितांना शांत करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेप्रकरणी तुरुंगशिपाई अजिंक्य आहेरे यांच्या फिर्यादीवरून शाहिद शेख, सचिन जाधव आणि आदित्य मेढे या तिघांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अतुल बागुल या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
![]()
