सत्यध्येय एकविचार भिवंडी, ठाणे प्रतिनिधी :
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कारिवली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय नाईक यांना साडेसात लाख रुपयांची कथित लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडल्याची घटना समोर आली आहे. कारिवली ग्रामपंचायत हद्दीत सुमारे २ कोटी ३३ लाख रुपयांच्या तलाव संवर्धन व सुशोभीकरणाच्या कामासाठी ठेकेदाराला हमीपत्र देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याचा आरोप सरपंचांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ठाणे ACBने खासगी कार्यालयात सापळा रचला. या कारवाईदरम्यान कथित लाचेची रक्कम स्वीकारताना सरपंच संजय नाईक यांना पकडण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.या कारवाईमुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांशी संबंधित व्यवहार, कंत्राटदारांना आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रशासकीय प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कोट्यवधींच्या विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला वाव राहू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे या प्रकरणातील कथित लाचेची मागणी, हमीपत्राशी संबंधित व्यवहार आणि इतर बाबींचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
![]()
