सत्यध्येय एकविचार उपसंपादक योगिता जोशी : नवी मुंबई
नवी मुंबईतील तळोजा परिसरात राहणाऱ्या तरुणीचे लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी अमित रामप्रवेश राय (वय ३२) याच्याविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने दुसऱ्या तरुणीशी विवाह केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२२ मध्ये पुणे येथे आरोपीची पीडित तरुणीशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. आरोपीने लग्नाचे आश्वासन दिल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. या आश्वासनाच्या आधारे जुलै २०२२ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.दरम्यान, पीडित तरुणीने लग्नाबाबत विचारणा सुरू केल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर मे २०२६ मध्ये आरोपीने मध्य प्रदेशातील प्राची पाठक या तरुणीशी विवाह केल्याची माहिती पीडितेला समजली. या घटनेनंतर पीडित तरुणीने तुर्भे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अमित रामप्रवेश राय याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. लग्नाचे आश्वासन, दीर्घकाळचे प्रेमसंबंध आणि त्यानंतर दुसऱ्या तरुणीशी विवाह केल्याच्या या प्रकरणामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
![]()
