सत्यध्येय एकविचार उपसंपादक योगिता जोशी :
नवी मुंबई, उलवे |
नवी मुंबईतील उलवे परिसरात कौटुंबिक हिंसाचाराची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गर्भवती पत्नीवर धारदार चाकूने वार केल्यानंतर तिच्या डोक्यावर गॅस सिलिंडरने प्रहार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पतीवर करण्यात आला आहे. ही घटना उलवे सेक्टर १९ मधील बालाजी होम सोसायटीत घडली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निखिल सामंत (वय २५) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याची पत्नी भारती सामंत (वय २४) गंभीर जखमी झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निखिल सामंत हा पत्नी भारती हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच कारणावरून तो तिला मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाल्यानंतर निखिलने गर्भवती भारतीवर धारदार चाकूने वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या डोक्यावर गॅस सिलिंडरने प्रहार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात भारतीच्या मानेवर, गळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्या असून, तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. गर्भवती महिलेवर झालेल्या या हल्ल्यामुळे तिच्या आणि गर्भातील बाळाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला आणि संशयित आरोपी पती निखिल सामंत याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशुतोष देशमुख करीत आहेत. हल्ल्याची नेमकी पार्श्वभूमी, यापूर्वी मारहाणीच्या घटना घडल्या होत्या का, तसेच वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे कोणती कायदेशीर कलमे लागू होतात, याचा तपासातून उलगडा होणार आहे.पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर हिंसाचार केल्याचा आरोप हा अत्यंत गंभीर असून, गर्भवती महिलेवर झालेला कथित जीवघेणा हल्ला समाजातील कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रश्नाला पुन्हा ऐरणीवर आणणारा आहे.
![]()
