सत्यध्येय एकविचार उपसंपादक योगिता जोशी कल्याण :
कल्याण पश्चिमेतील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. काळा तलाव, रामदेव हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी सहजानंद चौक आणि कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी मनसेचे नगरसेवक गणेश लांडगे यांनी महापौरांकडे केली आहे.अनधिकृत पार्किंगमुळे रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळासंबंधित परिसरात अनधिकृत चारचाकी पार्किंग, रिक्षांची गर्दी आणि रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी, नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रमुख चौक आणि रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीचे योग्य नियोजन न झाल्यास ही समस्या कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापौरांकडे तातडीच्या पाहणीची मागणी
या पार्श्वभूमीवर महापौरांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीची कारणे निश्चित करावीत आणि संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी गणेश लांडगे यांनी केली आहे. रिक्षांसाठी निश्चित थांबे आणि पार्किंगची शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करणे, अनधिकृत पार्किंगवर नियमानुसार कारवाई करणे तसेच गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करणे, या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस कृती आवश्यक
वाहतूक कोंडी हा केवळ प्रवासातील विलंबाचा प्रश्न नसून, आपत्कालीन वाहनांच्या हालचाली आणि शहरातील दैनंदिन वाहतूक व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचा आढावा घेऊन नियमांनुसार प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.आता महापौर आणि संबंधित प्रशासन या मागणीची कितपत दखल घेतात, तसेच कल्याण पश्चिमेतील प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
![]()
