सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी:
धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीविरोधात शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये किमतीची ६१० किलो गांजाची उभी पिके जप्त केली आहेत. आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागातील वनपट्ट्यावरील जमिनीवर अज्ञात व्यक्तींनी प्रतिबंधित कॅनाबीस वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागातील वनपट्ट्यावरील जमिनीवर गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे लावण्यात आल्याचे आढळून आले.या कारवाईदरम्यान राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच, वन परिक्षेत्रीय अधिकारी, वजनकाटाधारक, फोटोग्राफर आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. घटनास्थळावरून अंदाजे ६१० किलो वजनाची गांजाची उभी पिके जप्त करण्यात आली असून, त्यांची अंदाजित किंमत १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८१/२०२६ नुसार NDPS कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(क) आणि २२(क) अन्वये अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोंगराळ वनपट्ट्यात गांजाची लागवड कोणी केली, त्यामागे कोणाचे आर्थिक पाठबळ आहे, तसेच या अंमली पदार्थांची विक्री आणि वितरण करण्यासाठी कोणती साखळी कार्यरत होती, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील तसेच पोलीस अंमलदार अतुल पाटील, मनोज पाटील, अनिल सोनार, पवन ईशी, रविंद्र अखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, भटु साळुंके, विनोद अखडमल, सचिन वाघ, आरीफ तडवी, गोपाल माळी, सतिष भामरे, दादाभाई बोरसे, निलेश चौधरी, प्रशांत बाविस्कर, अनिता पवार, रविंद्र महाले, जगन्नाथ कोळी आणि होमगार्ड मिथुन पवार यांनी पार पाडली.शिरपूरच्या डोंगराळ भागात तब्बल दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची गांजाची लागवड आढळून येणे ही गंभीर बाब मानली जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थांच्या लागवडीला मोठा धक्का बसला असला, तरी या लागवडीमागील खरे सूत्रधार कोण, त्यांना कोणाचे पाठबळ आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचे जाळे किती मोठे आहे, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलीस कधी पोहोचतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
![]()
