सत्यध्येय एकविचार जळगाव प्रतिनिधी :
जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवनाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पाळधी-तरसोद बायपासलगत कचरा फॅक्टरी परिसरात सापळा रचून पोलिसांनी ६४.४४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थासह एका संशयिताला ताब्यात घेतले.या कारवाईत एमडीची अंदाजे १ लाख ९३ हजार ३२० रुपये किंमत, तसेच २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, असा एकूण २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गोपनीय माहितीवरून सापळा; दुपारी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात प्रभावी व कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून गोपनीय माहिती संकलित करण्यात येत होती.दरम्यान, अजय बिरजू गारुंगे (रा. तांबापुरा कंजरवाडा, मेहरुण, जळगाव) हा एमडी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी पाळधी-तरसोद बायपासजवळील कचरा फॅक्टरी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची पडताळणी करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.२० वाजता परिसरात सापळा रचला.संशयित व्यक्ती आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेनुसार झडती घेतली. यावेळी त्याच्याकडून ६४.४४ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला.३५ गुन्ह्यांची पार्श्वभूमी; पोलिसांच्या रडारवर सराईत आरोपी पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताविरुद्ध यापूर्वी एमडी व गांजा बाळगणे अथवा विक्री करणे, तसेच घरफोडीसह तब्बल ३५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सदर आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.दरम्यान, या प्रकरणात आरोपीसोबत असलेल्या अन्य दोन संशयितांचा तसेच संबंधित साक्षीदारांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. एमडीचा पुरवठा नेमका कुठून झाला, त्यामागे कोणाचे जाळे आहे आणि या अमली पदार्थाची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २९५/२०२६ नुसार NDPS Act कलम ८(क) व २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे स्वरूप, त्याचा स्रोत, संभाव्य खरेदीदार तसेच आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी संपर्कांची माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली LCBची कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत (परिमंडळ) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.कारवाईत पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार अकरम शेख, किशोर पाटील, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पोलीस नाईक/कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे, छगन तायडे तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद जाधव आणि गौरव पाटील यांनी सहभाग घेतला.अंमली पदार्थांच्या काळ्या बाजाराविरोधात जळगाव पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, या कारवाईतून एमडीच्या पुरवठा साखळीपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तपास पुढे सरकल्यानंतर या प्रकरणातील आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
![]()
