अहिल्यानगर | प्रतिनिधी
श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(अ), ३३१(३) प्रमाणे दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी दाखल झालेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत सराईत चोरट्याला जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल १६ लाख ५९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.फिर्यादी सतीश उत्तमराव भोईटे (रा. सांगवी, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील ५ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, मनोज साखरे, भगवान थोरात, रमेश राजा आतार तसेच महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.पथकाने घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे तपासाची सूत्रे हलवत पोलिसांनी नितीन दत्तात्रय जाधव (वय ४०, मूळ रा. गेवराई, जि. बीड, सध्या रा. हनुमाननगर, दौंड रोड, अहिल्यानगर) याच्यापर्यंत धागेदोरे पोहोचवले.संशयित आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले दागिने त्याने आपल्या राहत्या घरात लपवून ठेवले असल्याचे तसेच काही दागिने सराफ व्यवसायिकाला विकल्याचे उघड झाले.यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकून ८ लाख २३ हजार २६० रुपये किमतीचे ७७ ग्रॅम ६२ मिली सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपये किमतीचे २ लॅपटॉप जप्त केले. तसेच चौकशीदरम्यान संबंधित सराफ व्यवसायिकाकडून ८ लाख ३६ हजार रुपये किमतीचे ७० ग्रॅम ३९० मिली सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण १४८ ग्रॅम ०१ मिली सोन्याचे दागिने आणि २ लॅपटॉप, असा १६ लाख ५९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला.स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
![]()
