शिरपूर तालुका पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर धडक कारवाई करत तब्बल 44 लाख 63 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात विदेशी व देशी दारूने भरलेला कंटेनर आणि वाहनाचा समावेश आहे. या प्रकरणी हरियाणा राज्यातील चालकाला ताब्यात घेण्यात आले असून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि. 07 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10.30 वाजेच्या दरम्यान शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 मार्गे सेंधवा (मध्यप्रदेश) येथून धुळेच्या दिशेने जाणाऱ्या RJ 32 GB 4036 क्रमांकाच्या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर अवैध विदेशी दारूची वाहतूक केली जात आहे.माहितीची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तत्काळ शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार रात्री सुमारे 11.45 वाजता हाडाखेड चेकपोस्ट परिसरात संशयित कंटेनर आढळून आला. वाहन थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली असता त्याने आपले नाव सतिषकुमार पुडाराम जाट (वय 44), रा. चंदना थाना, तितरमोड, तहसील व जिल्हा कंथली, राज्य हरियाणा असे सांगितले.कंटेनरमध्ये कोणता माल भरलेला आहे याबाबत चालकाने समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. मध्यरात्री पंच व मजूर उपलब्ध नसल्यामुळे वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पंचांसमक्ष वाहनावरील सील तोडून झडती घेण्यात आली असता कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑल सीजन्स, अंकल टॉम आणि रॉयल चॅलेंज कंपनीच्या देशी-विदेशी दारूचे खोके आढळून आले.दारूच्या बाटल्यांवरील लेबल तपासले असता त्यावर “Only Sale for Union Territory Chandigarh” असे स्पष्टपणे नमूद असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर दारू महाराष्ट्र राज्यात शासनाचा कर चुकवून अवैधरित्या विक्रीसाठी आणण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी पोहेकॉ विजय हिवरे यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 154/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(1) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ), 65(इ), 80(1)(2), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोसई मनोज कचरे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक धुळे विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पोसई मनोज कचरे, पोहेकॉ संतोष पाटील, संदिप ठाकरे, योगेश मोरे, विजय हिवरे, स्वप्निल बांगर, सुनिल पवार, अल्ताफ मिर्झा आणि गुरुदास बडगुजर यांनी केली आहे.
![]()
