शिरपूर/ प्रतिनिधी
शिरपूर शहरातील महावीर सोसायटी परिसर आज दुपारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने हादरून गेला आहे. पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याचा राग मनात धरून मुलानेच स्वतःच्या आई-वडिलांच्या डोक्यात मुसळने वार करत त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे लग्न आटोपून इंदाराम महतो आणि रंजुदेवी इंदाराम महतो हे घरी परतले होते. त्यानंतर घरामध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला. पत्नीसमोर अपमान झाल्याच्या रागातून संतप्त झालेल्या आरोपी चंदन इंदाराम महतो याने घरातील मुसळ उचलून आई-वडिलांच्या डोक्यावर जोरदार वार केले. या भीषण हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित जाधव तसेच पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. व पुढील तपास सुरू केला आहे.या दुहेरी हत्याकांडामुळे महावीर सोसायटी परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “जन्मदात्या आई-वडिलांचाच जीव घेणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.पोलीसांकडून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती आणि घटनेमागील नेमके कारण याचा सखोल तपास केला जात आहे.
![]()
