जळगाव/प्रतिनिधी
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला, मैदानांमध्ये आणि वाईन्स शॉपच्या परिसरात खुलेआम दारू पिणाऱ्यांच्या वाढत्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिला, विद्यार्थी आणि कुटुंबांना या प्रकारांमुळे असुरक्षितता आणि भीतीचा सामना करावा लागत होता. अखेर या गंभीर समस्येची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः मैदानात उतरून संपूर्ण जिल्ह्यात धडक आणि कठोर मोहीम सुरू केली आहे.सायंकाळपासून सुरू झालेल्या या विशेष कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील दारूबाजांमध्ये अक्षरशः खळबळ उडाली असून, पोलिसांचा “Visible Action Plan” आता थेट रस्त्यावर दिसू लागला आहे.
🔥 “ओपन ड्रिंकिंग” करणाऱ्यांवर थेट पोलिसी धाड!
शहरातील मोकळी मैदाने, उद्याने, निर्जन जागा आणि रस्त्यांच्या कडेला टोळक्याने बसून मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांनी अचानक छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.फक्त दंडात्मक कारवाई न करता, कायद्याचा धाक निर्माण होईल अशा पद्धतीने पोलिसांनी “स्पॉट ॲक्शन” सुरू केली आहे. त्यामुळे अनेक तळीरामांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर येत आहे.
🚔 कारमध्ये ‘पार्टी’ करणाऱ्यांवरही पोलिसांचा फास आवळला
अनेक वाईन्स शॉपबाहेर कार उभ्या करून त्यामध्येच मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. काही ठिकाणी वाहनांमध्ये मोठ्या आवाजात गाणी, गोंधळ आणि महिलांना त्रास देण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली असून, कारमध्ये मद्यपान करणारे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर थेट कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
⚠️ हॉटेल, धाबे आणि टपऱ्यांनाही पोलिसांचा इशारा
परवाना नसतानाही ग्राहकांना उघड्यावर दारू पिण्याची मुभा देणाऱ्या काही हॉटेल्स, धाबे आणि टपऱ्यांवर पोलिसांनी वचक बसवण्यास सुरुवात केली आहे.अशा ठिकाणी बसून मद्यपान करणाऱ्यांसोबतच संबंधित व्यावसायिकांवरही कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे.“उघड्यावर मद्यपान सहन केले जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे.या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कारवाई पूर्णपणे “Visible” स्वरूपात केली जात आहे.गुन्हेगारांवर होणारी पोलिसी कारवाई नागरिकांना प्रत्यक्ष दिसावी, कायद्याबद्दल विश्वास निर्माण व्हावा आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्त प्रस्थापित व्हावी, यावर विशेष भर दिला जात आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मोहीमेचे नेतृत्व हाती घेतल्याने पोलीस यंत्रणा पूर्णपणे “ॲक्शन मोड”मध्ये दिसून येत आहे.त्यांच्या या थेट सहभागामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, विशेषतः महिला वर्गाने या मोहिमेचे जोरदार स्वागत केले आहे.“सार्वजनिक ठिकाणी मद्यपानामुळे महिलांना आणि कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम कायमस्वरूपी आणि अधिक कठोर स्वरूपात सुरू ठेवावी,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
![]()
