धुळे/प्रतिनिधी
धुळे जिल्हा कालच्या दुहेरी हत्याकांडाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच साक्री तालुक्यात आणखी एका थरारक दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उभरांडी शिवारात एका विवाहित महिला आणि एका तरुणाचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हे हत्याकांड भोंदुगिरी, अंधश्रद्धा आणि वैयक्तिक वादातून घडल्याचा धक्कादायक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित भोंदूला ताब्यात घेतले असून तपासाला वेग आला आहे.आज सकाळी भडगाव (वर्धाने) टेंभे फाट्याजवळ एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर अॅक्सेस १२५ (MH 18 CF 8151) ही दुचाकी टाकण्यात आलेली होती. महिलेचे तोंड रुमालाने घट्ट बांधलेले असल्याने हा अपघात नसून नियोजित घातपात असल्याचे पोलिसांच्या तात्काळ लक्षात आले.मृत महिलेची ओळख जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय २५, रा. कासारे) अशी पटली. जयश्री या बचत गटांसाठी बजाज फायनान्समार्फत कलेक्शनचे काम करत होत्या. काल रात्री उशिरा त्यांचे पतीशी शेवटचे फोनवर संभाषण झाले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद लागत होता. आज सकाळी त्यांच्या खुनाची बातमी समजताच काकुस्ते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.विशेष म्हणजे मृतदेहाजवळ तिची पर्स, मोबाईल आणि इतर साहित्य सुरक्षित अवस्थेत आढळले. त्यामुळे ही हत्या लुटीच्या उद्देशाने झालेली नसल्याचे स्पष्ट झाले.घटनास्थळी मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार (रा. जैताणे) याला ताब्यात घेतले. मात्र त्याने चौकशीत दिलेली माहिती पोलिसांनाही हादरवून सोडणारी होती.जयश्रीचा खून दुसऱ्या व्यक्तीकडून होत असताना आपण तिला वाचवण्यासाठी गेलो आणि झटापटीत त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा योगेशने केला. तसेच त्या तरुणाचा मृतदेह उभरांडी (जैताणे) शिवारातील निर्जन भागात, स्वतःच्या गौशाळा वजा मठाजवळील टेकडीवर पुरल्याची कबुलीही त्याने दिली.यानंतर पोलिसांनी उभरांडी शिवारात धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मृत तरुणाची ओळख अक्षय सोनवणे (वय २८, रा. भाडणे) अशी पटली.तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे या दोघांची हत्या एकाच ठिकाणी करण्यात आली असावी. संशय टाळण्यासाठी दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या दिशेला फेकण्यात आले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनास्थळी चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुणा आढळल्या. तसेच जयश्री यांच्या तोंडावर बांधलेला रुमाल संशयित भोंदूचा असल्याचा संशय पोलिसांना आला. मोबाईल लोकेशन, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक तपासामुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली.आधी अक्षयचा खून, नंतर जयश्रीची हत्या केल्याचा संशय मिळालेल्या माहितीनुसार, योगेश खैरनार हा भोंदुगिरी आणि बनवेगिरी करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याच्या मठात झालेल्या वादातून प्रथम अक्षय सोनवणे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर जयश्री काकुस्ते यांना त्यांच्या दुचाकीवर बसवून नेण्यात आले आणि वाटेत त्यांचाही खून करण्यात आल्याचा संशय आहे.घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत फॉरेन्सिक टीम, एलसीबी आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.एएसपी अजय देवरे यांनी देखील घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला. पोलिसांच्या जलद आणि समन्वयात्मक कारवाईमुळे अवघ्या काही तासांत मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात आला.
धुळे जिल्ह्यात वाढत्या भोंदुगिरीवर पुन्हा प्रश्नचिन्ह
या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्ह्यातील भोंदुगिरी, अंधश्रद्धा आणि तथाकथित महाराजांच्या वाढत्या प्रभावावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस तपास अंतिम टप्प्यात असून लवकरच या थरारक दुहेरी हत्याकांडाचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
![]()
