सत्यध्येय एकविचार भुसावळ प्रतिनिधी :
भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलाचा शोध घेण्याच्या बहाण्याने सात जणांच्या टोळक्याने एका नर्स महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे घुसून पती-पत्नीला गावठी पिस्टलचा धाक दाखवत “चेतनचा पत्ता सांगितला नाही तर गोळ्या घालून ठार मारू” अशी उघड जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी घरातील ₹८ हजारांची रोकड जबरदस्तीने लुटून दहशत माजवली.या गंभीर प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे.फिर्यादी मीनाक्षी संतोष पाटील (वय ५०) या व्यवसायाने नर्स असून त्या पतीसह श्रीराम नगर येथे वास्तव्यास आहेत. शनिवार (दि. २७ जुलै) रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता सात आरोपी त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. आरोपींनी फिर्यादींच्या मुलगा चेतन याची विचारपूस करत घरात आरडाओरड, शिवीगाळ आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले.यावेळी मुख्य आरोपी निलेश चंद्रकांत ठाकुर याने गावठी पिस्टल काढून फिर्यादी व त्यांच्या पतीला रोखत, मुलाचा ठावठिकाणा सांगितला नाही तर गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे दाम्पत्य भयभीत झाले.दहशत निर्माण करत असतानाच आरोपी विक्की अशोक कुमार लेखवाणी याने घरातील हॉलमध्ये टांगलेल्या पँटच्या खिशातून ₹८ हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात निलेश चंद्रकांत ठाकुर (रा. कंडारी, ता. भुसावळ), हेमंत जगदीश पैठणकर, प्रशांत संजय चौधरी, आकाश राजेंद्र पारधे, दीपक उर्फ ननट्या महालकर, विक्की अशोक कुमार लेखवाणी आणि अक्षय रवी कोळी (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरोधात घरात घुसखोरी, जबरी चोरी, जीवे मारण्याची धमकी, शस्त्राचा धाक दाखवणे व इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची गंभीर दखल घेत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करून हेमंत जगदीश पैठणकर, दीपक उर्फ ननट्या महालकर आणि विक्की अशोक कुमार लेखवाणी यांना अटक केली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून, त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत.
![]()
