सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील उखळवाडी येथील रास्तभाव दुकानाच्या कामकाजात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित पुरवठा विभागाकडे लेखी निवेदन सादर करून सखोल चौकशी व दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. मात्र ही बाब केवळ एका रास्तभाव दुकानापुरती मर्यादित न ठेवता शिरपूर शहरासह संपूर्ण तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दि. २४ जुलै रोजी उखळवाडी येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने संबंधित पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित रेशन दुकानदार लाभार्थ्यांना नियमानुसार धान्याचे वितरण करत नसल्याचा, तसेच वितरणाची अधिकृत पावती न देता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेलाच हरताळ फासल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.याशिवाय नवीन रेशनकार्ड काढून देण्यासाठी काही लाभार्थ्यांकडून अनधिकृतरीत्या पैशांची मागणी करून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर आवश्यक त्या कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन महिन्यांचे धान्य एकत्रित उपलब्ध होऊनही अनेक पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण धान्य देण्यात आले नाही. परिणामी अनेक गरीब व गरजू कुटुंबे शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, उखळवाडीतील प्रकार हा संपूर्ण सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील संभाव्य अनियमिततेचे संकेत असल्याने केवळ एका दुकानाची चौकशी करून प्रकरण दडपण्याऐवजी शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानांचे स्टॉक रजिस्टर, ई-पॉस मशीनची नोंद, वितरण नोंदवही, लाभार्थ्यांच्या पावत्या, धान्य साठा आणि आर्थिक व्यवहार यांची विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.यासोबतच ज्या लाभार्थ्यांना धान्य कमी मिळाले किंवा पावत्या देण्यात आल्या नाहीत, त्यांची स्वतंत्र सुनावणी घेऊन दोषी दुकानदारांविरुद्ध परवाना निलंबन अथवा रद्द करणे, आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.सार्वजनिक वितरण प्रणाली ही गरीब, श्रमिक आणि वंचित घटकांच्या अन्नसुरक्षेशी थेट संबंधित असल्याने या योजनेत कोणत्याही प्रकारची अनियमितता सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.निवेदन देताना कलाबाई भिल, कल्पनाबाई भिल, अरुणाबाई भिल, जिजाबाई भिल, मंगलबाई भिल, निर्मलाबाई भिल, बाणुबाई भिल, कुसुम भिल, शानुबाई भिल, मंगल भिल, जागृती भिल, चंदूबाई भिल यांच्यासह उखळवाडी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
“एकाच दुकानापुरती चौकशी नको; संपूर्ण शिरपूर तालुक्यात धडक तपासणी मोहीम राबवा!”
ग्रामस्थांनी पुरवठा विभागाकडे मागणी केली आहे की, उखळवाडीतील तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानांची अचानक तपासणी करून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळालेल्या धान्याची पडताळणी करावी. अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करून शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेत पारदर्शकता निर्माण करावी.
![]()
