सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी :
महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगलपोत व दागिने हिसकावून नेणाऱ्या संशयिताविरुद्ध शिरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत आशु ऊर्फ हसन अली नियाज अली इराणी, रा. पापा नगर, रजा टॉवरजवळ, भुसावळ याला ताब्यात घेतले असून, त्याची पत्नी फातिमा हसन अली इराणी (वय २१), रा. मुस्लिम कॉलनी, खडका रोड, भुसावळ हिलाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ७५ हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम (३ तोळे) सोने हस्तगत केले असून, शिरपूर शहरातील गुन्ह्याव्यतिरिक्त विविध जिल्ह्यांतील आणखी ७ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, महिलांच्या गळ्यातील चैन स्नॅचिंग, अमली पदार्थांची वाहतूक आणि तत्सम गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी DB पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.दि. २४ जुलै २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शिरपूर शहरातील कॉलनी परिसरातून मीना कैलास अग्रवाल (वय ६१) आणि मीराबाई आसाराम धनगर या घरी जात असताना काळ्या रंगाच्या बुलेट मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगलपोत बळजबरीने हिसकावून नेल्या होत्या. या घटनेत मीना अग्रवाल यांच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाची, तर मीराबाई धनगर यांच्या गळ्यातील सुमारे ७ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत चोरीस गेली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचा तपास सुरू करताना पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेतली. तपासादरम्यान हा गुन्हा भुसावळ येथील आशु ऊर्फ हसन अली नियाज अली इराणी याने त्याचा साथीदार सादिक अली इबादत अली इराणी, रा. पापा नगर, भुसावळ याच्या मदतीने केल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.त्यानंतर शिरपूर शहर पोलिसांचे पथक भुसावळ येथे रवाना झाले. सलग तीन दिवस संशयिताचा शोध घेण्यात आला; मात्र पोलिसांचा शोध सुरू असल्याची चाहूल लागताच तो भुसावळ येथून फरार झाला. त्यानंतर तो फैजपूर येथे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पथकाने फैजपूर गाठले. मात्र तेथूनही संशयित पसार झाला. कोणताही ठोस आधार नसताना पोलिसांनी सावदा, उदळी, काहूरखेडा मार्गे शोधमोहीम सुरू ठेवली.याचदरम्यान संशयित हरताळा, ता. मुक्ताईनगर येथील बिस्मिल्ला हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वेशांतर करून हॉटेल गाठले आणि तेथे बसलेल्या आशु ऊर्फ हसन अली इराणी याला शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान, त्याचा साथीदार सादिक अली इराणी याचा अपघात झाल्याने तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.ताब्यात घेतलेल्या आशु ऊर्फ हसन अली इराणी याची चौकशी केली असता गुन्ह्यातील सोन्याच्या मंगलपोत त्याची पत्नी फातिमा हिच्याकडे ठेवल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यानंतर पोलिसांनी भुसावळ येथून फातिमा हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर चोरीच्या सोन्याचा पुढील माग काढण्यात आला.आरोपीने भुसावळ येथील ओम जयबहादुर ठाकुर याच्याकडे सोने विकल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्याने आरोपी व त्याच्या पत्नीकडून सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. खरेदी केलेले दागिने वितळवून सोन्याच्या लगडी तयार करून ठेवल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या.यामध्ये ७ ग्रॅम वजनाची अंदाजे १४ हजार रुपये किमतीची सोन्याची लगड, ८ ग्रॅम वजनाची अंदाजे १६ हजार रुपये किमतीची सोन्याची लगड आणि १५ ग्रॅम वजनाची अंदाजे ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची लगड, अशा एकूण ३० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या लगडी, अंदाजे ७५ हजार रुपये किमतीच्या हस्तगत करण्यात आल्या.पोलिसांच्या तपासानुसार शिरपूर शहरातील गुन्ह्याव्यतिरिक्त देवपूर पोलीस ठाणे, चाळीसगाव रोड पोलीस ठाणे, नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे, सदरबाजार पोलीस ठाणे जालना, रामनगर पोलीस ठाणे चंद्रपूर येथील दोन गुन्हे आणि एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे जळगाव अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले आणखी ७ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.तसेच आशु ऊर्फ हसन अली नियाज अली इराणी याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ, खामगाव शहर, छावणी मालेगाव, वाशिम शहर, गाडगेनगर अमरावती, फ्रेजरपुरा आणि राजापेठ अमरावती आदी पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी विविध कलमांखाली गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या संशयिताची पुढील चौकशी महत्त्वाची ठरणार असून, आणखी गुन्हे किंवा साथीदार समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.शिरपूर शहर पोलिसांच्या या कारवाईत तपासाची दिशा बदलत असतानाही पथकाने जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. भुसावळ, फैजपूर आणि मुक्ताईनगर परिसरात सलग शोधमोहीम राबवत अखेर संशयिताला ताब्यात घेण्यात आले आणि चोरीच्या सोन्याचा माग काढून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन तसेच पोलीस अंमलदार रविंद्र आखडमल, अतुल पाटील, आरिफ तडवी, सचिन वाघ, गोविंद कोळी, मनोज महाजन, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, भटु साळुंके, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, सोमा ठाकरे आणि निलेश चौधरी यांनी मिळून केली आहे.शिरपूर शहर पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईमुळे चैन स्नॅचिंगच्या घटनांमागील साखळीचा तपास पुढे जाण्याची शक्यता असून, आरोपींच्या पुढील चौकशीत चोरीच्या मालाची विक्री, इतर साथीदार आणि आणखी किती गुन्ह्यांचा उलगडा होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
![]()
