सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी शिंदखेडा पोलीस ठाण्यात शांतता समिती व पोलीस पाटलांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सदर बैठक शिरपूर विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीस व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, नायब तहसीलदार शारदा बागले, पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) माया राजपूत, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. विनय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेमंत गोसावी, नगरपंचायत आरोग्य विभागाचे जितेंद्र अहिरे यांसह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाला व गणेश मंडळांना दिलेल्या प्रमुख सूचना:
रस्ते दुरुस्ती व स्वच्छता: सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, तसेच वीज वितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करावी. नगरपंचायत विभागाने शहरभरात स्वच्छता राखावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
डीजे व लेझरवर कडक निर्बंध:सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजे वापरताना निर्धारित डेसिबलच्या मर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. उत्सवात लेझर लाईटचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास डीजे मालक व मंडळावर कायदेशीर कारवाई करून डीजे जप्त केला जाईल, असा इशारा देण्यात आला.
सोशल मीडियावर कडक नजर:सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, रील्स किंवा व्हिडीओ अपलोड करून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. असा प्रकार आढळल्यास संबंधित ग्रुप ॲडमिनवर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल.
उत्कृष्ट मिरवणुकीला पुरस्कार:शांतता समिती, पत्रकार, डॉक्टर, वकील आणि पोलीस विभागाची एक संयुक्त समिती स्थापन केली जाईल. ही समिती मिरवणुकांचे निरीक्षण करेल आणि उत्कृष्ट व शिस्तबद्ध मिरवणूक काढणाऱ्या मंडळाला पोलीस विभागामार्फत बक्षीस देऊन गौरविले जाईल, अशी घोषणा विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केली.
उत्कृष्ट परंपरेचा पुनरुच्चार:
शिंदखेडा शहर हे नेहमीच शांतताप्रिय राहिले असून येथे कोणत्याही उत्सवाला आजपर्यंत गालबोट लागलेले नाही, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. बैठकीदरम्यान शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे प्रा. निरंजन वेंदे, प्रा. मधुकर मंगळे आणि चंद्रकांत गोधवाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा आणि स्वच्छतेचे प्रश्न मांडले, जे पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने तत्परतेने सोडवले जातील असे आश्वासन देण्यात आले.बैठकीचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी केले. त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. यामध्ये यापूर्वीच सर्व गणेश मंडळ अधिकारी, डीजे व्यावसायिक आणि व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन यांची स्वतंत्र बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सदर बैठकीस शांतता समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार , डॉक्टर, नागरिक, तसेच परिसरातील पोलीस पाटील (महिला व पुरुष) मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे अनंत पवार यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
![]()
