सत्यध्येय एकविचार शिंदखेडा (यादवराव सावंत प्रतिनिधी):
ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या मोठ्या उघडीपीमुळे शिंदखेडा तालुक्यातील खरीप पिके करपून गेली असून शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शिंदखेडा तालुक्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नायब तहसीलदार शारदा बागले यांना देण्यात आले. प्रशासनाने मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा थेट इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला.तालुका अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील कापूस, मका आणि इतर खरीप पिके ऐन भरण्याच्या स्थितीत असताना पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मशागत आणि फवारणीवर हजारो रुपये खर्च केले आहेत. कर्ज काढून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाया जात असल्याने केवळ पंचनामे आणि आश्वासने देऊन बोळवण करू नये, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला.
काँग्रेसच्या प्रमुख १० मागण्या:
कोरडा दुष्काळ व आर्थिक मदत : तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ₹७५,०००/- ची मदत द्यावी.
संयुक्त पंचनामे: महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून सर्व खरीप पिकांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी.
पीक विमा व कर्जमाफी: पीक विम्याची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करावी, सरसकट शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी आणि कर्जवसुलीला तात्काळ स्थगिती द्यावी.
चारा छावण्या व वीज समस्या: जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. रात्री वन्यप्राण्यांच्या धोक्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा पुरेसा वीजपुरवठा करावा.
स्मार्ट मीटर सक्ती रद्द : नवीन स्मार्ट वीज मीटर बसविण्याची सक्ती त्वरित बंद करावी.
विद्यार्थ्यांचे प्रश्न: उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी.
प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
शेतकरी हा अन्नदाता असून त्याच्या पाठीशी उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे. या मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी न झाल्यास तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, धरणे आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा तालुका अध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिला.या प्रसंगी प्रमोद सिसोदे, डॉ. जे. पी. बोरसे, दीपक अहिरे, अॅड. प्रशांत बेहेरे, देविदास भदाणे, ज्ञानेश देसले, आर. एल. सोनवणे, गजानन भामरे, शरद पवार, विनोद पाटील, जगदीश बागुल, आनंदा मोरे, राजाराम मोरे, किशोर माळी, किरण महंत, महेंद्र भिल, गजानन पाटील, रमेश महाले, युवराज मोहन, अनिल मालचे, रतिलाल पाटील, शाम बोरसे, मनोज कुवर, रहीम खाटीक यांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
