सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी :
जामन्यापाणी वनक्षेत्रालगतच्या अति दुर्गम भागात अवैधरित्या लागवड करण्यात आलेल्या कॅनाबीस (गांजा सदृश्य) वनस्पतीच्या शेतीवर शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वनविभागाने संयुक्तपणे मोठी धडक कारवाई केली. भोरखेडा, रोहीणी आणि खंबाळे येथील तब्बल ९० गुंठे क्षेत्रावर उभी असलेली अंदाजे ३,०७२ किलो कॅनाबीस वनस्पती, ज्याची अंदाजे किंमत ७ कोटी ६८ लाख रुपये आहे, घटनास्थळीच नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे दुर्गम वनक्षेत्राचा आधार घेत अंमली पदार्थांची अवैध लागवड करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी जामन्यापाणी वनक्षेत्रालगतच्या परिसरात अज्ञात व्यक्तींनी कॅनाबीस वनस्पतीची लागवड केल्याची गोपनीय माहिती वनविभाग तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आणि वनविभागाने संयुक्त कारवाईची तयारी केली.सदर परिसर अति दुर्गम असल्याने मोठ्या प्रमाणातील गांजा किंवा कॅनाबीस वनस्पती घटनास्थळावरून वाहून आणणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन NDPS कायदा १९८५ मधील कलम ५२-अ अन्वये न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करण्यात आले. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे यांच्याकडे आवश्यक आदेशासाठी प्रस्ताव सादर केला. न्यायालयाच्या आदेशानुसार घटनास्थळी इन्व्हेंटरी तयार करून मुद्देमाल नष्ट करण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वनविभागाच्या पथकाने भोरखेडा, रोहीणी आणि खंबाळे या अति दुर्गम भागात संयुक्त छापा टाकला. विशेष कार्यकारी दंडाधिकारी, दोन शासकीय पंच, वजनकाटा धारक, फोटोग्राफर तसेच राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या कारवाईत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॅनाबीस वनस्पतीचे उभे पीक आढळून आले.कारवाईत ८२८ किलो कॅनाबीस वनस्पतीची अंदाजे किंमत २ कोटी ७ लाख रुपये, २,१४४ किलो वनस्पतीची अंदाजे किंमत ५ कोटी ३६ लाख रुपये आणि १०० किलो वनस्पतीची अंदाजे किंमत २५ लाख रुपये, असा एकूण ३,०७२ किलो कॅनाबीस वनस्पतीचा सुमारे ७ कोटी ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल निष्पन्न झाला. त्यापैकी मोठ्या प्रमाणातील उभे पीक घटनास्थळीच नष्ट करण्यात आले, तर १० गुंठे क्षेत्रातील १०० किलो कॅनाबीस वनस्पती पुढील कायदेशीर सोपस्कारांसाठी जप्त करण्यात आली.छापा कारवाईदरम्यान हुकला भिकला पावरा, रा. खंबाळे, ता. शिरपूर, जि. धुळे याचे नाव निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले असून संबंधित वनपट्टा क्रमांकही प्राप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४५/२०२६, गु.र.नं. २४६/२०२६ आणि गु.र.नं. २४७/२०२६ असे तीन स्वतंत्र गुन्हे NDPS कायद्यान्वये दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.अति दुर्गम आणि वनक्षेत्रालगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर कॅनाबीस वनस्पतीची लागवड करून त्यातून अंमली पदार्थांची निर्मिती अथवा विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. दुर्गम भागाचा फायदा घेत अवैध अंमली पदार्थांची शेती करणाऱ्यांवर पोलिस आणि वनविभागाची करडी नजर असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक धुळे विशाल आनंद, उपवनसंरक्षक धुळे (प्रादेशिक) मोहन नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि सहायक वनसंरक्षक राहुल घरटे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.कारवाईमध्ये कार्यकारी दंडाधिकारी महेश साळुंखे, तहसील कार्यालय शिरपूर, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, वन परिक्षेत्रीय अधिकारी-सांगवी विशाल दुसाणे, कैलास सोनवणे, सुनील जोग, किरण गिरवले, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार तसेच शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वनविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.एकाच कारवाईत तब्बल ७ कोटी ६८ लाख रुपयांच्या कॅनाबीस वनस्पतीचा नाश करून शिरपूर पोलिस आणि वनविभागाने अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दुर्गम भागात सुरू असलेल्या अशा अवैध लागवडींचा शोध घेण्यास आणि त्यावर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाला मोठी चालना मिळाली आहे.
![]()
