सत्यध्येय एकविचार जळगाव प्रतिनिधी :
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘स्पा ९९’ या स्पा सेंटरवर दामिनी पथकाने धडक कारवाई करत कथित देहविक्रीच्या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली असून, या तरुणी परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या संशयास्पद व्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पोलिसांना ‘स्पा ९९’मध्ये संशयास्पद तसेच बेकायदेशीर हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची सत्यता पडताळण्यासाठी दामिनी पथकाने काही दिवस या सेंटरवर गोपनीय पद्धतीने पाळत ठेवली. पोलिसांनी घाईघाईने कारवाई न करता प्रथम संपूर्ण प्रकाराची खातरजमा करण्यावर भर दिला.त्यानंतर पथकाकडून नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्यात आली. प्राथमिक माहितीची पडताळणी करण्यासाठी पथकाने पंटरच्या माध्यमातून सेंटरमधील कथित व्यवहाराची माहिती घेतली. या प्रक्रियेदरम्यान गुप्तपणे रेकॉर्डिंग करण्यात आल्याची माहिती असून, त्यातून मिळालेल्या पुराव्यांची पोलिसांनी शहानिशा केली.पुरावे आणि माहितीची खातरजमा झाल्यानंतर दामिनी पथकाने अचानक ‘स्पा ९९’वर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पाच तरुणींची सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये सिक्कीम, मणिपूर आणि नेपाळ येथील तरुणींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.या स्पा सेंटरमध्ये प्रामुख्याने उच्चभ्रू ग्राहकांची ये-जा असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील नेमका प्रकार, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि स्पा सेंटरचा कारभार याबाबत पुढील तपासानंतरच अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे.या प्रकरणी संबंधितांविरुद्ध लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे स्पा सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार सुरू असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून गेला आहे.दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या तरुणींच्या पार्श्वभूमीची तसेच त्यांना या ठिकाणी कोण आणि कशा पद्धतीने आणले, याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.
![]()
