सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
शिंदखेडा तालुका व परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतातील इलेक्ट्रिक मोटारी आणि केबल वायर चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आधीच पावसाच्या ओढीमुळे पिके सुकत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यातच आता चोरट्यांच्या त्रासामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या गंभीर समस्येकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष संतोष देसले यांच्या नेतृत्वाखाली बाधित शेतकऱ्यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले.गेल्या महिनाभरापासून शिंदखेडा, पाटण, नेवाडे, वरपाडे, अमळथे आणि सोनेवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रिक मोटारी आणि महागड्या केबल वायर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वीही गेल्या महिन्यात पाटण व शिंदखेडा शिवारातील बन्सीलाल पाटोळे सह शेतकऱ्यांनी केबल चोरीबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, तरीही चोरीचे सत्र थांबलेले नाही. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे, परंतु मोटारी आणि केबल चोरीला गेल्यामुळे शेतीला पाणी कसे द्यावे, असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, या चोरीच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून पुढील ८ दिवसांच्या आत चोरट्यांचा शोध घेऊन कडक बंदोबस्त करण्यात यावा. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न केल्यास शिंदखेडा, पाटण, नेवाडे, वरपाडे, सोनेवाडी व अमळथे परिसरातील सर्व शेतकरी बांधव शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष संतोष देसले यांच्यासह बन्सीलाल पाटोळे, भाऊसाहेब धनराज पाटील, आत्माराम पाटील, नंदलाल पवार, बळवंत पाटील, महेश पाटील, सतिष पाटील, रामकृष्ण पाटील, शिवाजी पाटील, निबाजी पाटील, मच्छींद्र पाटील, विनोद पाटील, रामचंद्र पाटील, गुलाबराव पाटील, भुषण पाटील, जगदिश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नाना चौधरी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
