सत्यध्येय एकविचार धुळे प्रतिनिधी :
शहर व जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, स्थानिक गुन्हे शाखा, धुळेच्या पथकाने विना परवाना गावठी कट्टा (पिस्टल) आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका व्यक्तीला जेरबंद केले आहे. मंजूर शाह डबु शाह (वय ३६, रा. गवळीवाडा, जामा मशिद मागे, मोगलाई, धुळे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक तसेच मा. पोलीस अधीक्षक, धुळे यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध शस्त्रांविरोधात विशेष कारवाई सुरू आहे.दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, धुळे शहरातील वलवाडी, जय संतोषी माता कॉलनी परिसरातील नदीकिनारी पुलाच्या बाजूच्या रोडवर पथकाने कारवाई केली. यावेळी मंजूर शाह यास संशयास्पद परिस्थितीत ताब्यात घेऊन त्याच्याकडील शस्त्राची झडती घेतली असता एक देशी गावठी कट्टा (पिस्टल) मॅग्झीनसह आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.पोलिसांनी त्याच्याकडून ₹४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा (पिस्टल) व ₹१ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस, असा एकूण ₹४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने हे शस्त्र सुमारे एक ते दीड वर्षापूर्वी मध्य प्रदेशातील उमर्टी येथून खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. शस्त्र बाळगण्यामागील उद्देश तसेच त्याचा यापूर्वी कोणत्या गुन्हेगारी प्रकरणात वापर झाला आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४९/२०२६, शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेले शस्त्र आणि काडतूस याबाबत पुढील तपास सुरू असून, या प्रकरणामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक धुळे श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सपोनि. दिपक ढोके तसेच पोलीस अंमलदार आरीफ पठाण, राहुल सानप, शिरीष भदाणे, प्रकाश सोनार, संदीप पाटील, देवेंद्र ठाकुर आणि आशिषकुमार वानखेडे यांनी केली.अवैध शस्त्रे बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांच्या या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
![]()
