सत्यध्येय एकविचार शिंदखेडा (यादवराव सावंत प्रतिनिधी):
तालुक्यातील दभाशी येथील गट नंबर ८ (क्षेत्र २२ हेक्टर ७२ आर) व गट नंबर २ (क्षेत्र ४४ हेक्टर २४ आर) अशा एकूण ६७ हेक्टर ९६ आर जमिनीवर गेल्या ५५ ते ६० वर्षांपासून अविरत शेती कसणाऱ्या १८ आदिवासी भिल समाज बांधवांना वन हक्क कायद्यांतर्गत त्यांच्या नावाचा सातबारा उतारा देण्यात यावा, या मागणीसाठी भिल समाज विकास मंचच्या वतीने नायब तहसीलदार शारदा बागले यांना निवेदन देण्यात आले. १५ दिवसांत ही मागणी पूर्ण न झाल्यास शिंदखेडा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात देण्यात आला आहे. शिंदखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने या आदिवासी बांधवांना पाठिंबा दर्शविला आहे
पिढ्यानपिढ्या कसणाऱ्या जमिनीवर उपासमारीची वेळ
दभाशी येथील विक्रम शामराव भिल, रामचंद्र पंडित भिल, किसन कायसिंग भिल, राकेश गोरख भिल, राकेश शालिक भिल, दिलीप गोरख भिल, भास्कर गोटू भिल, शालिक हिरामण भिल, पार्वताबाई सुखराम भिल, महारू हिरामण भिल, सुखराम श्रावण भिल, भैया भालेराव भिल, आकाश सुरेश भिल, जयसिंग श्रावण भिल, कल्पना भीमराव भालेराव, भिकूबाई रमेश गायकवाड व जिजाबाई दंगल मोरे हे सर्व भूमिहीन आदिवासी शेतकरी सदर जमिनीवर स्वतः राबवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मागील १० ते १२ वर्षांपासून सातबारा नावावर करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. चौकशी होऊन व कब्जा नोंद असूनही त्यांना हक्काचा सातबारा मिळालेला नाही. अशिक्षितपणामुळे व प्रशासकीय दुर्लक्षामुळे हे कुटुंब न्यायापासून वंचित आहेत.
जामफळ धरणाच्या कामामुळे पिकांचे नुकसान
नुकतेच शासनाच्या जामफळ धरणाचे काम व पाईपलाईनचे काम सुरू असून, कसल्या जाणाऱ्या शेतजमिनीलगत खड्डे, मातीचे ढिगारे व कामगारांचे शेड उभारून पिकांचे अतोनात नुकसान केले जात आहे. मागील ३ वर्षांपासून सुरू असलेल्या या कामांमुळे आदिवासी बांधवांना शेती करणे दुरापास्त झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच काही इसम जाणीवपूर्वक पिकांमध्ये गुरे सोडून नुकसान करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
पिढ्यानपिढ्या जल, जमीन आणि जंगलाचे रक्षण करणाऱ्या या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित ठेवणे हा अन्याय आहे. प्रशासनाने तात्काळ सर्व बाबींची चौकशी करून १८ ही अर्जदारांच्या नावावर वन हक्क कायद्यानुसार सातबारा उतारा लागू करावा. येत्या १५ दिवसांत सकारात्मक कारवाई न झाल्यास भिल समाज विकास मंचच्या वतीने संपूर्ण तालुक्यात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी दभाशी येथील सर्व बाधित आदिवासी शेतकरी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
![]()
