सत्यध्येय एकविचार धुळे | प्रतिनिधी
देशभरातील व्यापाऱ्यांना ‘स्वस्त तांब्या’चे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठा पर्दाफाश केला आहे. निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामदे गावात अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री विशेष कॉम्बिंग व सर्च ऑपरेशन राबवून पोलिसांनी २५ संशयितांसह दोन महिलांना ताब्यात घेतले असून, टोळीकडून ४३ दुचाकी, २ चारचाकी वाहने, सुमारे साडेचार किलो चांदी, मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्राथमिक तपासात ही टोळी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुजरात, इंदूर, मुंबईसह विविध राज्यांतील व्यापाऱ्यांशी संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्वस्त दरात तांबे विक्रीचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना ठरावीक ठिकाणी बोलावले जात असे. त्यानंतर विविध कारणे सांगून आर्थिक व्यवहार करत फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकाराला स्थानिक भाषेत ‘ड्रॉप केस’ पद्धतीची फसवणूक म्हणून ओळखले जाते.या कारवाईसाठी धुळे पोलिसांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले होते. ड्रोनच्या साहाय्याने परिसरावर सतत नजर ठेवण्यात आली. मध्यरात्री २ ते सकाळी ८ वाजेपर्यंत सलग कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन राबवून संशयितांना घेराव घालण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या धडक कारवाईत ४३ दुचाकी, २ चारचाकी वाहने, सुमारे ४.५ किलो चांदी, अनेक मोबाईल हँडसेट, लॅपटॉप, रोख रक्कम तसेच तपासासाठी महत्त्वाचे ठरणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या वाहनांचा व साहित्याचा वापर फसवणुकीच्या गुन्ह्यांत झाला आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक ओंकार गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली १७ अधिकारी व मोठ्या पोलीस पथकाने ही मोहीम यशस्वी केली.दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची चौकशी सुरू असून, या टोळीचे धागेदोरे इतर राज्यांतील फसवणुकीच्या गुन्ह्यांशी जोडलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. तसेच देशातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तत्सम गुन्ह्यांशी या टोळीचा संबंध आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
![]()
