राहुरी | प्रतिनिधी
राहुरी तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अवघ्या काही तासांत जेरबंद करत स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कामगिरीची छाप पाडली आहे. मुळा धरण परिसरातून आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि इतर साहित्य असा तब्बल २ लाख ४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, दि. २९ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मोमीन आखाडा (ता. राहुरी) येथील दगडू गंगाराम कोहकडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. आरोपी प्रविण बाबासाहेब कोहकडे (वय २२) याने पूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या कारणावरून फिर्यादीचा जीव घेण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून घटनास्थळावरून पलायन केले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ तसेच आर्म अॅक्ट कलम ७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली.पोउपनि संदीप मुरकुटे तसेच पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, बाळासाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे आणि प्रशांत राठोड यांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढला. आरोपी बारागाव नांदूर ते मुळा धरण परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने सापळा रचला.पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काळे जॅकेट घालून विनानंबर मोटारसायकलवर फिरणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव प्रविण बाबासाहेब कोहकडे असल्याची कबुली दिली.झडतीदरम्यान आरोपीकडून ३० हजार रुपयांचा गावठी कट्टा, ४ हजार रुपयांची चार जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, कट्टा ठेवण्याचे लेदर पाऊच आणि काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या असा एकूण २,०४,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळत स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला आहे की, कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे राहुरी परिसरात समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये मात्र मोठी खळबळ उडाली आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करत आहे.
![]()
