शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहर पोलिसांनी चारचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत चोरीस गेलेले रु. 1.40 लाख किमतीचे पिकअप (छोटा हत्ती) वाहन हस्तगत केले असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे शाळेच्या कामासाठी वापरले जाणारे वाहन मालकास परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 मे 2026 रोजी जळोद (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील आश्रमशाळेच्या आवारातून शाळेचे धान्य वाहतुकीसाठी वापरले जाणारे पिकअप वाहन क्रमांक MH-15/CK-4882 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 234/2026, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुने भामपूर परिसरातील दोन संशयितांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संगम गंगाराम सोनवणे (भिल) (वय 22) व अनिल खेमराज भिल (भवरे) (वय 22) यांना ताब्यात घेतले.सखोल चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून विखरण गावाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेले चोरीचे वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी रु. 1,40,000 किमतीचे वाहन हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.या कारवाईमुळे वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा संदेश शिरपूर शहर पोलिसांनी दिला आहे.सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ( तात्पुरता प्रभार शिरपूर शहर पोलीस ठाणे ) आणि पोलीस अंमलदार रविंद्र अखडमल,अतुल पाटील , योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, सोमा ठाकरे, आरीफ तडवी, सचिन वाघ , विनोद अखडमल,गोविंद कोळी, मनोज महाजन , भटू साळुंखे व प्रशांत पवार यांनी उल्लेखनीय कारवाई यशस्वी केली.
![]()
