भुसावळ | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात भ्रष्टाचाराविरोधातील मोठी कारवाई समोर आली असून, अटक न करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इसमाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात आरोपी म्हणून
१) राजू सांगळे — पोलीस उपनिरीक्षक, बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ
२) सलीम हकीम कुरेशी उर्फ फ्रेशी, रा. बोदवड
यांची नावे समोर आली आहेत.
सदर कारवाई भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ व ७(अ) अंतर्गत करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव करीत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या मित्राविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दि. २८ मार्च २०२६ रोजी खडका चौफुली परिसरात उधारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ मारहाणीच्या घटनेतून नोंदविण्यात आला होता.तक्रारदारांना या गुन्ह्यात अटक न करता केवळ “चॅप्टर केस” करून सोडण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. ही मागणी खाजगी इसम सलीम कुरेशी याने “सांगळे साहेबांसाठी” केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.यानंतर तक्रारदारांनी थेट PSI राजू सांगळे यांची भेट घेतली असता, तडजोडीअंती २० हजार रुपयांवर व्यवहार निश्चित झाल्याचे ACB च्या पडताळणीत समोर आले. आरोपींनी लाच स्वीकारण्यास संमती दर्शवून रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ACB ने गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई सुरू केली.या प्रकरणाची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईची प्रक्रिया राबवून संपूर्ण प्रकरणाची नोंद घेतली.या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले असून, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे तसेच ACB जळगावच्या विशेष पथकाने कारवाईत सहभाग घेतला.दरम्यान, “कायद्याचे रक्षण करणाऱ्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका आवश्यक असल्याची मागणीही जोर धरत आहे.तपास पुढे सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
![]()
