शिरपूर | प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे (हस्सीसपुर) येथील तापी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उत्खननामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, वंचित बहुजन आघाडीने थेट प्रशासनालाच जाब विचारत कठोर कारवाईची मागणी केली आहे. दि. 26 मे 2026 रोजी उपविभागीय अधिकारी, शिरपूर यांना सविस्तर निवेदन देत वाळू माफियांविरोधात तात्काळ धडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.निवेदनानुसार, शासनाने निश्चित करून दिलेल्या नियम व अटींचे उघडपणे उल्लंघन करत तापी नदीपात्रात जेसीबी, पोकलेन यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. एवढेच नव्हे तर डंपर, ट्रेलर आणि हायवा वाहने थेट नदीपात्रात उतरवून नियमबाह्य पद्धतीने वाळू वाहतूक केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित वाळू ठिय्याच्या मर्यादेबाहेर जाऊन शिरपूर हद्दीतील उप्परपीड शिवारातही मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल विभाग, खनिज विभाग आणि पर्यावरण यंत्रणेच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. “सर्व काही उघडपणे सुरू असताना प्रशासनाला हे दिसत नाही का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, नदीपात्रातील अशा प्रकारच्या अनियंत्रित उत्खननामुळे भूजल पातळी झपाट्याने खालावत असून नदीचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात येत आहे. भविष्यात शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि नदीकाठच्या गावांवर गंभीर पर्यावरणीय संकट ओढवू शकते, असा इशाराही व्यक्त केला जात आहे.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, जर अवैध वाळू उत्खननावर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे आता प्रशासन खरोखर धडक कारवाई करते की पुन्हा एकदा केवळ कागदी घोडे नाचवले जातात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शिरपूर तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ, तालुका उपाध्यक्ष प्रवीण वाघ, तालुकासचिव निलेश रणदिवे, तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण राजपूत, तालुका संघटक गुलाब शेटे व तालुका सचिव करण खैरणार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
![]()
