अहिल्यानगर/ प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत वाळू माफियांना जोरदार धक्का दिला आहे. ऐनतपुर ता. श्रीरामपुर येथे अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह आरोपीला ताब्यात घेत तब्बल रु. ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये तसेच पोनि. श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे, भगवान थोरात आणि विशाल तनपुरे यांचे विशेष पथक अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी रवाना करण्यात आले होते.दिनांक २५ मे २०२६ रोजी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पथक पेट्रोलिंग करत असताना ऐनतपुर गावाच्या शिवारात एक विटकरी रंगाचा टाटा टेम्पो संशयास्पदरीत्या वाळू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ वाहन थांबवत चालकाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव आकाश नाना निकम (वय २१, रा. आटवाडी, बेलापूर ता. श्रीरामपुर) असे सांगितले.वाहतुकीसंदर्भात वैध परवान्याची मागणी केली असता आरोपीकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुमारे रु. २० हजार किमतीची २ ब्रास वाळू तसेच रु. ५ लाख किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण रु. ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी आरोपीविरुद्ध श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस करत आहेत.
![]()
