धुळे | प्रतिनिधी
“एक लाखाचे तीन लाख करून देतो” असे आमिष दाखवत मध्यप्रदेशातील शिक्षकाला धुळे जिल्ह्यात बोलावून चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ८ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा कसून शोध सुरू आहे.दि. ३० मे २०२६ रोजी खोरी (निजामपूर) ता. साक्री येथील पवनचक्की परिसरात फिर्यादी अनिल उमरावसिंह बोडाणा (वय ३५, व्यवसाय शिक्षक, रा. उज्जैन, मध्यप्रदेश) यांना १२ ते १४ जणांच्या टोळीने घेरले. गळ्याला चाकू लावून फोन-पे द्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले. तसेच रोख रक्कम, चांदीची चैन व इतर साहित्य हिसकावून घेत एकूण ₹१ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लुटला.मुख्य सूत्रधार बाळुशेठ ऊर्फ राकेश सजनसिंग भोसले (रा. जामदे, ता. साक्री) याने इंस्टाग्रामवर “₹१ लाखाचे ₹३ लाख करून देतो” अशा प्रकारच्या रिल्स टाकून लोकांना जाळ्यात ओढण्याचा डाव रचला होता. या आमिषाला बळी पडलेल्या फिर्यादीला धुळे जिल्ह्यात बोलावण्यात आले. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने त्याला निर्जनस्थळी नेऊन मारहाण करण्यात आली.
⚡ पोलिसांची वीजगती कारवाई
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.पथकाने मंगेश भैय्या कढरे (वय २५, रा. भामेर, ता. साक्री) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात मुकेश प्रकाश भामरे याचाही सहभाग निष्पन्न झाला.या धाडसी आणि परिणामकारक कारवाईमुळे सोशल मीडियावरून आर्थिक आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. धुळे पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, गुन्हेगार कितीही शिताफीने गुन्हा करून पसार झाले तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाहीत.
🏅 या धडाकेबाज कारवाईतील शिलेदार
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे,पोलीस अंमलदार सदेसिंग चव्हाण,पंकज खैरमोडे,तुषार सूर्यवंशी,महेंद्र सपकाळ,अतुल निकम,योगेश जगताप,संजय सुरसे,यांच्या अथक परिश्रमांमुळे अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्यात यश आले.
![]()
