धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आरिफ आर. पठाण यांनी चैन स्नॅचिंग आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
आझादनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 90/2026 आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 21/2026 या गंभीर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान दि. 22 मे 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोहेकॉ आरिफ पठाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह विशेष कारवाई केली.या कारवाईत चैन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे 2 लाख 22 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल, ज्यामध्ये सोने-चांदीचे दागिने तसेच तीन मोटारसायकलींचा समावेश आहे, हस्तगत करण्यात आला. या यशस्वी कारवाईमुळे चैन स्नॅचिंग व घरफोडीचे गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.या उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरीमुळे धुळे जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, इतर पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोहेकॉ आरिफ पठाण यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान केले. यावेळी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे, तपास कौशल्याचे आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले.धुळे जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सातत्याने कार्यरत असून, अशा कारवायांमुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
“कर्तव्य, धाडस आणि तपास कौशल्याच्या जोरावर गुन्हेगारांना गजाआड करणारे पोहेकॉ आरिफ पठाण यांचा हा सन्मान संपूर्ण धुळे पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरला आहे.” 🚔🏅
![]()
