शिरपूर | प्रतिनिधी
अवाजवी वीजबिले, वारंवार होणारे वीजखंडितीकरण आणि शेतकऱ्यांना मिळणारा अपुरा वीजपुरवठा यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आज शिरपूर येथे महावितरण (MSEB) कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन छेडले. शिरपूर फर्स्टच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या मांडत महावितरण प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.गेल्या काही महिन्यांपासून शहर व ग्रामीण भागातील हजारो ग्राहकांना वापराच्या तुलनेत अवास्तव वीजबिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. अनेक ग्राहकांना घर बंद असतानाही किंवा अत्यल्प वापर असूनही हजारो रुपयांची बिले आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असून महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दुसरीकडे, तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमानुसार पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने पिकांचे सिंचन प्रभावित होत आहे. विशेषतः खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे खोळंबत असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या समस्यांमुळे शेतकऱ्यांचा रोष उफाळून आला आहे.आंदोलनादरम्यान नागरिकांनी आपल्याला आलेल्या अवाजवी वीजबिलांचे “तोरण” तयार करून महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावले. या अनोख्या आणि लक्षवेधी आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांचे तसेच प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.यावेळी आंदोलकांनी महावितरण कार्यालयात नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क सुरू करावी, चुकीच्या वीजबिलांची तातडीने तपासणी करावी, तसेच शेतकऱ्यांना नियमित व पुरेसा वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी केली.आंदोलनात नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आणि व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
![]()
