धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात गुंगीकारक औषधांच्या अवैध साठवणूक, वाहतूक व विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अत्यंत धडक आणि नियोजनबद्ध कारवाई करत तब्बल ₹10 लाख 51 हजार 250 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या कोडीनयुक्त कफ सिरपच्या शेकडो बाटल्या विनापरवाना विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणात गुजरातमधील तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या गुंगीकारक औषधे, अमली पदार्थ व बेकायदेशीर औषध विक्रीविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथक सक्रिय केले.दि. 20 जून 2026 रोजी एलसीबीला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार एजाज रफीक शेख (वय 25, रा. सलाबादपुरा, सुरत, गुजरात) हा इनोव्हा कार क्रमांक GJ-16/BB-2607 मधून मोठ्या प्रमाणात गुंगीकारक कफ सिरप घेऊन सुरतहून मालेगावकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची शहानिशा करून एलसीबीच्या पथकाने राजपत्रित अधिकारी व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत कुसुंबा गावाजवळील उड्डाणपुलाखाली सापळा रचला.संशयित वाहन तेथे येताच पोलिसांनी ते अडवून झडती घेतली असता वाहनातून Codeine Phosphate आणि Triprolidine Hydrochloride या मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या घटकांचे मोठ्या प्रमाणातील कफ सिरप आढळून आले. तपासणीदरम्यान REXTON-T आणि CANAX-T10 या ब्रँडच्या एकूण 410 बाटल्या जप्त करण्यात आल्या.कारवाईत ₹41 हजार 250 किमतीचे गुंगीकारक कफ सिरप, ₹10 लाख किमतीची इनोव्हा कार आणि ₹10 हजार किमतीचा मोबाईल असा एकूण ₹10 लाख 51 हजार 250 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भाग गुन्हा रजिस्टर क्रमांक 370/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123 व 278, गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 (NDPS Act) कलम 8(क), 21(ब), 22 तसेच औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 चे कलम 18(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग होताच पोलिसांनी गुजरातमध्ये धडक मोहीम राबवून प्रविण जिवाराम सिरवी (वय 32, व्यवसाय – मेडिकल) व इरफान उर्फ भिका इस्माईल मुलतानी (वय 33) यांना सुरत येथून अटक केली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 25 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार आणि वितरण साखळीचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये या गुंगीकारक औषधांचा पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या अवैध नेटवर्कशी संबंधित आणखी काही व्यक्ती तपासाच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे तसेच पोलीस अंमलदार आरीफ पठाण, संदीप साहेबराव पाटील, राहुल सानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकुर, प्रशांत माळे, विवेक वाघमोडे, अमोल पाटील आणि संजय सुरसे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
जिल्ह्यात युवकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या अवैध व्यापाराविरोधात धुळे पोलिसांनी उघडलेली ही मोहीम पुढील काळात आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.
![]()
