शिंदखेडा / प्रतिनिधी
शिंदखेडा शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत असलेल्या बी.के. देसले नगर, गल्ली क्रमांक १ येथील रहिवाश्यांना गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर नागरी समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील गटारीचे काम अडीच ते तीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून असल्याने गटारीचे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरातील बाथरूम आणि टॉयलेटमध्ये परत येत असून संतप्त नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळा सुरू होताच परिस्थिती अधिकच बिकट बनते. गटारीचे घाण पाणी घरांमध्ये शिरत असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून साथीच्या रोगांचा धोका देखील वाढला आहे.या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नगरसेवक दिपक देसले यांनी नगरपंचायतीच्या सलग दोन सर्वसाधारण सभांमध्ये हा विषय उपस्थित केला होता. तसेच त्यांनी अनेकदा नगरपंचायत कार्यालयात भेट देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले. मात्र, अद्यापही या समस्येवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, यापूर्वीच्या नगरसेवकांकडेही वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळीही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्षा कलावती माळी यांनाही नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून परिस्थितीची माहिती दिली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, नगरसेवक दिपक देसले यांनी नागरिकांना दिलासा देताना, “बी.के. देसले नगरातील गटाराचा प्रश्न अत्यंत गंभीर असून तो कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मी सातत्याने नगरपंचायत प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे आश्वासन दिले.
🔴 नागरिकांचा थेट सवाल
“घरात गटाराचे पाणी येत असताना प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे?”
🔴 मुख्य मागण्या
अर्धवट गटार काम तातडीने पूर्ण करावे.
पावसाळ्यापूर्वी कायमस्वरूपी निचरा व्यवस्था करावी.
आरोग्य धोक्यात आणणाऱ्या परिस्थितीवर त्वरित उपाययोजना करावी.
संबंधित कामातील विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी.
बी.के. देसले नगरातील रहिवाश्यांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गटारीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत होत असून आता प्रत्यक्ष कामाचीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
![]()
