शिरपूर | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवैध मद्यव्यवसायाविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ₹67 लाख 77 हजार 250 किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. जोयदा येथील एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात मद्यार्क, ब्लेंड आणि विदेशी मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त यु. आर. वर्मा तसेच धुळे विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जवान हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने 21 जून 2026 रोजी जोयदा येथील संशयित गोदामावर धाड टाकली.छाप्यामध्ये 39,520 लिटर मद्यार्क व ब्लेंड तसेच दमन राज्यात विक्रीसाठी असलेल्या इम्पेरियल ब्ल्यू आणि मॅकडॉवेल्स नं. 1 ब्रँडच्या 6,480 सीलबंद दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. प्राथमिक तपासात हा मद्यसाठा महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या विक्रीसाठी आणल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी गोदाम मालक ताराचंद सायसिंग पावरा तसेच मद्याचा कथित मालक प्रवीण भालचंद्र वाणी उर्फ दादा वाणी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपी दोषी आढळल्यास त्यांना कठोर कारावास व दंडाची तरतूद लागू होऊ शकते.ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर, दुय्यम निरीक्षक संतोष निकम, दुय्यम निरीक्षक डी. जी. गवळी, जवान हेमंत पाटील तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.कारवाईदरम्यान संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून गोदामाची तपासणी करण्यात आली. जप्त करण्यात आलेला मद्यसाठा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.धुळे जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर भूमिका घेतली असून अशा कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे अधीक्षक स्वाती काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
“अवैध मद्य तस्करांना कोणतीही गय नाही; कायद्याचा बडगा अधिक कठोरपणे उगारला जाईल,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.
नागरिकांना आवाहन
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल-फ्री क्रमांक 18002339999, WhatsApp क्रमांक 8422001133 किंवा दूरध्वनी क्रमांक 02562-297484 वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
![]()
