धुळे | प्रतिनिधी
साक्री व पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पशुधन चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) धुळे यांनी पर्दाफाश करत ९ म्हशी, २ पारडे आणि चोरीसाठी वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण १५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे पशुधन चोरीचे तीन आणि वाहन चोरीचा एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.पशुधन चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी विशेष तपास पथक तयार करून सात दिवस साक्री, पिंपळनेर, निजामपूर तसेच परिसरातील विविध भागात गुप्त तपास आणि तांत्रिक विश्लेषण सुरू ठेवले.या तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार साक्री-नवापूर मार्गावरील एका पानटपरीजवळून संशयित आरोपी सुरेश ऊर्फ सुऱ्या रमेश गावीत याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह पशुधन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर जंगल परिसरातून चोरीस गेलेल्या म्हशी, पारडे आणि वाहन जप्त करण्यात आले.
हस्तगत मुद्देमाल
९ म्हशी ,२ पारडे ,टाटा आर.एक्स. वाहन (MH-18/AA-2376) एकूण किंमत : ₹१५.९० लाख
पोलिसांच्या तपासात ही टोळी आंतरजिल्हा स्तरावर कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले असून फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्या अटकेनंतर आणखी पशुधन चोरी, शेती अवजारे चोरी व शेतमाल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.ही उल्लेखनीय कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, तपास अंमलदार सदेसिंग चव्हाण, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, जगदीश सूर्यवंशी, योगेश जगताप, अमोल पाटील आणि कैलास महाजन यांनी मोलाची भूमिका बजावत ही यशस्वी कारवाई पार पाडली.शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे पशुधन परत मिळवून देत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची छाप उमटवली आहे.
![]()
