शिरपूर/प्रतिनिधी
शहरातील काझी नगर परिसरात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीच्या घटनेने संपूर्ण शिरपूर शहरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी शिक्षक दांपत्याच्या बंद घराला लक्ष्य करत तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भूषण पाटील व त्यांच्या पत्नी प्रा. पूजा पाटील हे शहरातील काझी नगर परिसरात वास्तव्यास आहेत. डॉ. पाटील हे आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांची पत्नीही अध्यापन क्षेत्राशी संबंधित आहेत. नेहमीप्रमाणे दोघेही सकाळी घराला कुलूप लावून कामासाठी महाविद्यालयात गेले होते.याच संधीचा फायदा घेत दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून परिसरात आले. त्यांनी आधी घराची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर चोरट्यांनी घराच्या गेटवरून उडी मारून प्रवेश केला. मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडत घरात प्रवेश करून त्यांनी थेट कपाटातील लॉकरवर डल्ला मारला. लॉकर फोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन चोरटे काही मिनिटांत पसार झाले.घरफोडीची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये दोन संशयित तरुण दुचाकीवरून येताना आणि घराच्या दिशेने जाताना स्पष्टपणे दिसत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा माग काढण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत.भरदिवसा घडलेल्या या घरफोडीने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी गर्दीच्या वस्तीतील घराला लक्ष्य करून मोठी चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “घर बंद ठेवून बाहेर जाणेही आता धोकादायक झाले आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिकांकडून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी
अलीकडच्या काळात शहर व परिसरात चोरी, घरफोडी आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी रात्रीबरोबरच दिवसा देखील गस्त वाढवावी, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवावे आणि सीसीटीव्ही नेटवर्क अधिक प्रभावी करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.दरम्यान, या प्रकरणाचा तपास शिरपूर शहर पोलीस करीत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
![]()
