सत्यध्येय एकविचार | पिंपळनेर प्रतिनिधी
गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत पिंपळनेर पोलिसांनी घरफोडीचा यशस्वी छडा लावला. कुडाशी येथील रेशन दुकान फोडून गव्हाचे कट्टे चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक करत चोरीस गेलेला माल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकलींसह तब्बल ₹1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या जलद आणि परिणामकारक कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.दि. 9 जुलै 2026 रोजी पहाटे 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुडाशी येथील पंढरीनाथ बारकू पवार यांच्या शासकीय रेशन दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील ₹50 हजार किमतीचे 50 किलो वजनाचे गव्हाचे 10 कट्टे चोरून नेण्यात आले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(अ), 331(3) व 331(4) अन्वये घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नामदेव सहारे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक तपास आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास करून संशयितांची ओळख निश्चित केली.तपासादरम्यान पोबारे (पोस्ट कुडाशी, ता. साक्री) येथील प्रदीप छोटीराम गांगुर्डे (25), गुलाब गोकुळ शिंदे (21), योगेश यशमल बहिरम (24) आणि मंगेश गुलाब सावळ (26) यांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान चौघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.आरोपींकडून चोरीस गेलेले ₹50 हजार किमतीचे गव्हाचे 10 कट्टे, ₹70 हजार किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल आणि ₹50 हजार किमतीची हिरो आयस्मार्ट मोटारसायकल असा एकूण ₹1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे.चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्याशी संबंधित आणखी काही धागेदोरे, इतर साथीदार किंवा तत्सम गुन्ह्यांतील सहभाग याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नामदेव सहारे यांच्या नेतृत्वात अशोक पवार, कांतीलाल अहिरे, विश्वास हजारे, योगेश महाले, संदीप पावरा आणि पंकज वाघ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
![]()
