सत्यध्येय एकविचार | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे खंडणी व खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अचूक गुप्त माहितीच्या आधारे जेरबंद केले. आरोपीला पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या कारवाईमुळे गंभीर गुन्हे करून फरार होणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.दि. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या स्विफ्ट कारने बीफ मार्केट परिसरात जात असताना आरोपी सर्फराज बाबा शेख, इरफान मोईनुद्दीन शेख उर्फ इप्या, लुकमान इसाक शहा, राहुल भिमा सोनवणे व अजहर युसुफ शेख यांनी फिर्यादीची कार अडवून ₹५० हजारांची खंडणी मागितली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी कोयत्याने जीवघेणा हल्ला करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे तसेच पोलीस अंमलदार फुरकान शेख, रमीजराजा आतार, प्रकाश मांडगे, सुनिल मालनकर, मनोज मोहन साखरे आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने फरार आरोपींचा शोध सुरू केला.दि. ११ जुलै २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत आरोपी अजहर युसुफ शेख (वय २२, रा. वॉर्ड क्र. १, संजयनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळताच पथकाने तातडीने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.ताब्यातील आरोपीला पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. फरार आरोपींना जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या नियोजनबद्ध कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
![]()
