सत्यध्येय एकविचार | शिरपूर प्रतिनिधी
वृद्ध नागरिकांना लक्ष्य करून एटीएम कार्ड हातचलाखीने बदलत त्यांच्या बँक खात्यातील रक्कम लंपास करणाऱ्या हरियाणा व उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, एटीएम कार्ड तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली टोयोटा ग्लांझा कार असा ₹5 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एटीएम फसवणुकीच्या चार घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.दिनांक 23 जून 2026 रोजी शिरपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून आरोपींनी हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढून फसवणूक केली. या घटनेनंतर शिरपूर शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढला. तपासादरम्यान चांदवड (जि. नाशिक) येथील स्वामी प्राईड हॉटेलसमोर सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अलीम रमजान मेव (वय 32), समुन रमजान मेव (वय 38), नासिर दिनू मेव (वय 27), तिघेही रा. घागोट, जि. पलवल (हरियाणा) तसेच सलमान फजरूद्दीन मेव (वय 28), रा. चिट्टर, जि. बुलंदशहर (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.आरोपींकडून रोख रक्कम, मोटोरोला व विवो कंपनीचे मोबाईल, एक मोबाईल, एटीएम कार्ड तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली टोयोटा ग्लांझा कार (क्रमांक HR-30/AA-8351) असा एकूण ₹5,23,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तपासादरम्यान आरोपी वृद्ध नागरिकांना लक्ष्य करून त्यांना बोलण्यात गुंतवत एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यातील पैसे काढत असल्याचे उघड झाले. या टोळीने अशाच प्रकारच्या चार एटीएम फसवणुकीच्या घटनांची कबुली दिली असून त्यांची उकल करण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश आले आहे.ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस अंमलदार रविंद्र अखडमल, अतुल पाटील, सचिन वाघ, सोमा ठाकरे, आरीफ तडवी, विनोद अखडमल, भटू साळुंखे, मनोज महाजन, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार आणि अमोल पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.
![]()
