सत्यध्येय एकविचार शिंदखेडा | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी माजी नगरसेवक सुरज देसले मित्र परिवार यांच्या वतीने जीवनावश्यक साहित्य व वैद्यकीय किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला.वारकऱ्यांच्या प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घेता यावी तसेच आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. शिंदखेडा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अर्जुन माळी यांना प्रथम वैद्यकीय किट प्रदान करून वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी बोलताना सुरज देसले म्हणाले की, “वारकरी संप्रदायाची सेवा करणे हे आमचे सौभाग्य आहे. वारीदरम्यान वारकऱ्यांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”या सेवाभावी उपक्रमाचे मंत्री जयकुमार रावल यांनी कौतुक करत सामाजिक कार्यासाठी सुरज देसले मित्र परिवाराचे अभिनंदन केले. तसेच पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे आणि शिंदखेडा आगाराला नवीन बसगाड्या मंजूर करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सुरज देसले व शिंदखेडा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अर्जुन माळी यांच्या हस्ते ना. जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, विविध पदाधिकारी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, सुरज देसले मित्र परिवाराचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांच्या सेवेसाठी हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत कौतुक केले.
![]()
