सत्यध्येय एकविचार बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात आरोपींनी एका विवाहित महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून धारदार शस्त्राचा धाक दाखवत तिच्या पतीसमोरच आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय १९) आणि तिचा पती घरी झोपलेले असताना दोन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून त्यांना धमकावले. आरोपींनी विळ्यासारख्या धारदार शस्त्राचा धाक दाखवत पतीला गप्प बसण्यास भाग पाडले आणि त्याच्यासमोरच महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.घटनेनंतर पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत सामूहिक बलात्कार, घरात घुसखोरी, जीवाला धमकी आणि इतर संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गंभीर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पथके नियुक्त केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत आहे.या अमानुष घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून, आरोपींना तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
![]()
