सत्यध्येय एकविचार चोपडा | प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील एका गावात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या विवाहितेवर जबरदस्तीने मद्य पाजून निर्जनस्थळी नेऊन सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अडावद पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधून जितेंद्र रामदास भोई (वय ३३, रा. धानोरा) आणि गणेश सुकदेव भोई (वय २३, रा. धानोरा) यांनी तिला जबरदस्तीने मद्य पाजल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी तिला दुचाकीवर बसवून एका निर्जन नाल्याजवळ नेले आणि तेथे तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.घटनेनंतर पीडिता घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर पतीने तातडीने अडावद पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. तक्रारीची गंभीर दखल घेत प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत १८ जुलै रोजी दोन्ही संशयितांना ताब्यात घेत अटक केली.आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) लागू तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या काळात घटनेचे सर्व पैलू, पुरावे, वैद्यकीय अहवाल तसेच इतर बाबींचा सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान, या घटनेमुळे चोपडा तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
![]()
