सोनगीर | सत्यध्येय एकविचार प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील बुरझड येथे शेतीच्या सामाईक बांधाच्या किरकोळ वादाने गंभीर वळण घेत एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने एक शेतकरी खाली पडून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नाना सदा ठेलारी (वय ५०, रा. बुरझड) हे शेती व्यवसायासोबत मेंढपाळाचेही काम करत होते. त्यांच्या शेताच्या सामाईक बांधाच्या कारणावरून शामराव दगा पाटील (वय ५५, रा. बुरझड) यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वाद अधिक चिघळत गेला आणि आरोपीने शिवीगाळ करत संतापाच्या भरात नाना ठेलारी यांच्या अंगावर धाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या धक्काबुक्कीत नाना ठेलारी यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे बुरझड परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतीच्या किरकोळ वादातून एका कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावल्याने गावात शोककळा पसरली आहे.या घटनेप्रकरणी मृत नाना ठेलारी यांचा मुलगा पप्पुलाल नाना ठेलारी यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी शामराव दगा पाटील याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा सखोल तपास सोनगीर पोलीस करत आहेत.
![]()
