सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तहसील कार्यालयातील इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कार्यालयातील पुरुष प्रसाधनगृहाच्या स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने घटना घडली त्या वेळी प्रसाधनगृहात कोणीही उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, काही क्षणांचा हा फरक एखाद्याचा जीव घेऊ शकला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.विश्वसनीय माहितीनुसार, तहसील कार्यालयाच्या इमारतीत यापूर्वीही अनेक ठिकाणी स्लॅबचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काही भागांमध्ये स्लॅबला मोठे तडे, खिंडार आणि झीज स्पष्टपणे दिसून येत असूनही संबंधित बांधकाम विभाग आणि प्रशासनाने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, तातडीची दुरुस्ती किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या हजारो नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.इतकेच नव्हे तर, तहसील कार्यालयातील प्रसाधनगृहांची नियमित साफसफाई होत नसल्याने तेथे अस्वच्छता, दुर्गंधी आणि अस्वास्थ्यकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी तसेच कर्मचारी यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही ही बाब चिंताजनक मानली जात आहे.सरकारी कार्यालयात सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे ही संबंधित प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. सार्वजनिक इमारतींची नियमित देखभाल, धोकादायक भागांची दुरुस्ती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे संबंधित विभागाचे कर्तव्य आहे. संभाव्य धोका माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यास, भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच कायदेशीर जबाबदारी निश्चित होऊ शकते, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे स्वतंत्र तांत्रिक स्ट्रक्चरल ऑडिट, धोकादायक भागांचे तातडीने मजबुतीकरण व दुरुस्ती, प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविण्याची मागणी केली आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशीही जोरदार मागणी होत आहे.
![]()
