सत्यध्येय एकविचार धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील दत्त मंदिर परिसर व आजूबाजूच्या भागातील काही लॉजमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर देवपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका लॉजवर छापा टाकला. या कारवाईत ७ प्रौढ प्रेमीयुगुल आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. तपासात सर्व संबंधित व्यक्ती प्रौढ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून समक्ष समुपदेशन करत कडक तंबी दिली.या कारवाईची पार्श्वभूमी अशी की, परिसरातील नागरिकांनी काही लॉजमध्ये सकाळी लवकरपासून तासाच्या आधारावर खोल्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याची तसेच संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गंभीर तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत संबंधित लॉजवर अचानक छापेमारी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.नगरसेवक माळी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले होते की, दत्त मंदिर परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग तसेच दाट लोकवस्ती असल्याने विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा संवेदनशील परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्यास त्याचा युवक, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्व लॉजच्या नोंदवही, पाहुण्यांची ओळखपत्रे, सीसीटीव्ही फुटेज यांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच अल्पवयीन व्यक्ती आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हे दाखल करून लॉज चालकांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.या निवेदनाची गंभीर दखल घेत देवपूर पोलिसांनी आज सकाळी जीटीपी चौक परिसरातील एका लॉजवर अचानक छापा टाकला. कारवाईदरम्यान सात जोडपी आढळून आली. तपासात सर्वजण प्रौढ असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी त्यांचे समुपदेशन करून पालकांच्या उपस्थितीत कठोर इशारा देण्यात आला. तसेच लॉज व्यवस्थापनाच्या नोंदी, कागदपत्रे आणि नियमपालनाचीही तपासणी करण्यात आली.या कारवाईनंतर परिसरातील लॉज चालकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी देवपूर पोलिसांच्या तत्परतेचे तसेच नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले आहे. नागरिकांनी अशा कारवाया नियमितपणे सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लॉजवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणात नागरिकांनाही जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद हालचाली, अल्पवयीन मुला-मुलींचा गैरवापर अथवा कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवून समाजहितासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह माहिते, महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक मिलिंद सोनवणे, पोहेकॉ किरण मेहरुणकर, विजय जाधव, पोकॉ राजेश हिरे, भटेंद्र पाटील, वसंत कोकणी, मधुकर पाटील, राहुल गुंजाळ, शुभम बोरसे, सौरभ कुटे तसेच दामिनी पथकातील पोकॉ निता डाबेराव, माधुरी सोनवणे आणि मृणाली भावसार यांनी केली.
![]()
